Monday, 6 April 2009

धोबीपछाड



गेले काहि दिवस माती मऊ आहे म्हणुन ती मुळाने खणण्याचा अट्टाहास काहि जण करीत आहेत. पण आता परीस्थिती अति झालं आणि हसु आलं याच्याहि बाहेर गेलीये. मुळात फक्त ब्राह्मण द्वेष हा एक आणि एकच अजेंडा काहि संस्थांकडुन अव्याहत राबवला जातोय. आणि त्याला कोणाचा राजकिय पाठिंबा आहे हे उघड-गुपित आहे.

तसा मूळातुन विचार करता ब्राह्मण समाजाने दलितांवर बरेच अत्याचार केले आहेत हा सत्य इतिहास आहे. पण सगळं खापर जे एकट्या ब्राह्मणांवर फोडलं जातय त्यात मात्र तथ्य नाहिये. उलट ब्राह्मण समाजापेक्षाहि काकणभर जास्त इतर वर्णांनी त्रास दिलाय. बर्‍याच दलित नेत्यांनी तसं स्पष्टपणे ऐकवले सुध्दा आहे. सध्या ब्राह्मणांवर गरळ ओकण्याचा जो काहि हिन प्रकार सुरु आहे तो शिसारी आणणारा आहे. फुले-आंबेडकर-शाहु-शिंदे यांनी देखिल इतक्या खालच्या थराला जाऊन ब्राह्मणांवर गरळ ओकली नव्हती. आणि तसे बघता यांचे काहि सहकारी अथवा यांना पाठिंबा देणारे काहि जण तर ब्राह्मणच होते. महात्मा फुलेंना शाळेसाठि जागा देणारे “भिडेच” होते. बालगंधर्व तर शाहुंच्या गळ्यातील ताईतच होते, इतके कि शाहुंचे उजवे हात समजले जाणारे जाधव प्रभुती देखिल “तुम्हांला बालगंधर्व जास्त जवळचे वाटतात !” असे हिरमुसुन म्हणताना दिसतात. शिंदे तर टिळकांच्या जवळच्या व नंतर तात्विक वादांमुळे दुर गेलेल्यांपैकी एक. महर्षी शिंदे यांनी सावरकरांवर त्यांच्या जात्योच्छेदनाच्या कार्यामुळे जाहिर स्तुतीसुमने उधळली होती. थोडक्यात सामाजिक-राजकिय अथवा तात्विक कारणांनी वरील प्रस्थापितांनी ब्राह्मणांवर कडक ताशेरे ओढले होते पण त्यांनी “गरळ” ओकली नव्हती. उलटपक्षी टिळक-शाहु वादात एका केस संबधी काहि अति गोपनीय कागद टिळकांपर्यंत पोहोचतील व टिळकांना त्यांचीच बाजु भक्कम करता येईल अशी व्यवस्थाच शाहुंने केल्याचा उल्लेख मिळतो. याबाबत प्रबोधनकारांनी शाहुंना प्रश्न विचारल्यावर “अरे तो(लोकमान्य टिळक) तिथे इंग्रजांशी एकहाती झुंज घेत असताना त्याच्या मार्गात कुटल्याहि कारणाने आम्हि का यावे?” असे उत्तर दिले. आणि आज त्याच टिळकांवर “लोकमान्य कसला भटमान्यच” असे एकेरी शेलकी विशेषण लावत हे फिरत आहेत. आणि अशी शेलकी-निर्बुध्द विशेषणे एकट्या लोकमान्यांवरच नव्हे तर “ब्राह्मण” असलेल्या प्रत्येकावर चिकटवत फिरत आहेत
आता दादोजी कोंडदेव-समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक-राजकिय संबधांवर बोट ठेवण्यात येत आहे. तसा तर हा वाद जुनाच आहे. सुरुवात महात्मा फुल्यांनी केली. “गागाभट्ट व रामदासाने निरक्षर शिवाजीस गोड बोलुन फसविले!” अशी एक ओळ देखिल त्यांच्या लिखाणात सापडते. पण छत्रपती शिवाजी महाराज हि व्यक्ती निरक्षर मुळिच नव्हती व समोरचा गोड बोलतोय म्हणुन फसेल अशी तर नव्हतीच नव्हती. भारतात जे “द्रष्टे” झाले त्यापैकी एक असलेले शिवराय अश्या भुलथापांना बळि पडत असते तर स्वराज्य उभे राहिलेच नसते. महाराज काळाच्या फार पुढचा विचार करायचे. आणि महाराजांना माणुस ओळखता यायचा म्हणुनच “आम्हि महाराजांचे सेवक, तुझा कौल कोण घेतो? शिवशंभु आम्हांस हसेल!” असे म्हणत दिलेरखानावर दातओठ खाणारा मुरारबाजी पुरंदरावर स्वराज्यासाठी पडला. अशी माणसे गोळा करुन एकत्र आणणारे शिवराय गागाभट्ट व रामदास स्वामी यांना ओळखणार नाहित काय?

विषय निघालाच आहे तर सांगतो कि गागाभट्ट व शिवराय काहि राज्यभिषेकाच्या निमित्तानेच एकत्र आले नव्हते. तर त्याच्याहि आधी बरीच वर्षे म्हणाजे निदान ८-१० वर्षे आधी शेणवी समाज्याच्या निवाड्यात गागाभट्ट शिवाजीराजे जो निर्णय देतील तो मान्य करावा. असे विधान करतात. आता गागाभट्टांसारखा वेदशास्त्रसंप्पन दशग्रंथी ब्राह्मण एका जातीच्या निवाड्यात राज्याभिषेका आधीच राजांना न्याय देण्यास सांगतो म्हणजे गागाभट्टांना शिवरायांचे कार्य व त्यांची निर्विवाद योग्यता आधीच माहित होती असे दिसते. दुसरी गोष्ट – राज्याभिषेक झाल्यावरच राजाला अथवा त्या क्षत्रियाला ब्राह्मणांच्या सामाजिक-धार्मिक अथवा कौटुंबिक प्रश्नात निर्णय देता येत असे. गागाभट्टांना जर महाराजांना फसवायचे होते तर त्यांना राज्यभिषेक करवलाच कसा? कारण त्यांना ब्राह्मणसमाजाचे वर्चस्व अबाधित ठेवायचे होते तर कितीहि दक्षीणा दिली तरी त्यांनी महाराजांना राजेपद द्यावयास संमती दिलेच नसती. आणि कोटी रुपये दक्षीणा अथवा यांच्याच भाषेत सांगायच तर “लाच” हि गागाभटांसाठि मोठी गोष्ट नव्हती. काशी क्षेत्रीचा वेदोमुर्ती म्हंटल्यावर पैसा-मानमरातब-प्रसिध्दि हे त्यांना अज्जिबात नविन नव्हतं. ती दक्षीणा मिळणारच होती. यांचा अजुन एक आक्षेप असतो की “माझ्या हातुन काहि प्रमाद घडल्यास अथवा मी माझी राजाची कर्तव्ये पार पाडण्यात कसुर केल्यास, राजगुरु माझ्या मस्तकावर धर्मदंडाचा प्रहार करुन मला पदच्युत करतील!” अशी शपथ महाराजांना घ्यायला लावली होती. इथे त्यांना बामनी कावा वाटतो, पण जर महाराजांना प्रजेचा निवाडा करण्याचा हक्क असेल तर राजावर देखिल एखादा अंकुश असलाच पाहिजे. मुळात धर्मसत्ता व राजसत्ता यांना एकमेकांचा धाक नसेल तर राज्य टिकत नाहि. गावचा पाटिल झाला म्ह्णुन गावच बुडवावा का? ते तसे होऊ नये म्हणुन गेली हजारो वर्षे भारतातच नव्हे तर जगभर राजसत्ता-धर्मसत्ता एकमेकांना धरुन असतात. याचा अर्थ राजा वाईट असतो म्हणून नव्हे तर आअपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडतो अहोत की नाहि हे बघणारं कोणी असेल तर काम नीट होतं. इथे तर समाजाचा प्रश्न अहे. आणि एकट्या शिवरायांनाच नव्हे तर कुठल्याहि राजाला हि शप्पथ घ्यावीच लागायची.

1 comment:

namrata said...

brahman samaj ha pahilya pasunach ek vegala samaj manala jato, tyachi kahi udaharne hi aaplya itihasat aahet, pan tase baghitale gele tar hi manase khup premal suddha aahet, ha aaj je kahi brahman samaja barobar hot aahe te kharach chukiche aahe,
itihas jo ghadun gela tyala parat parat ghadavane yat kahi tathtya nahi aahe, aaj pratyek manus saman aahe, uccha nich hi bhavnach kharokhar khup chukichi aahe, pratyek manus ha aaplya parine khup motha aahe, he pratyekane lakshat thevave,